थोर तुझे उपकार आई



लेखन दि. जुलै २००७ व संपादन जानेवारी २०१५
थोर तुझे उपकार आई

      आईचे महत्व सांगण्याइतपत माझे व्यक्तीमत्व एवढे मोठे नाही, तरी देखील आईबद्दल काही बोलावेसे वाटते.
      आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर या दोन शब्दांनी आई हा पवित्र शब्द तयार झाला आहे. आई आपल्या बाळाची काळजी स्वत:पेक्षाही जास्त घेत असते. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आईशिवाय घर एकदम सुनसान वाटायचे आणि म्हणून आपली नजर सतत एकाच चेह-याच्या शोधात निघायची तो चेहरा म्हणजे प्रेम स्वरुप आई. तिने आपल्याला बोलायला, चालायला, वडीलधा-या व्यक्तींशी कसे बोलावे अर्थात आपले सर्व व्यक्तीमत्व ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या घडवत असते म्हणून तिला आपण आपला पहीला गुरु मानतो आणि मानलाच पाहीजे. स्वामी विवेकानंदानी म्हटले आहे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी जर आई नसती तर जगणं व्यर्थच झाल असतं. आपल्याला काही दुखत-खुपत असेल किंवा काही हवं असेल तर आईला ते आपोआपच कळते आणि असा अनुभव मला आज देखील येतो; तुम्हालाही या प्रकारचा अनुभव येतच असेल. अशाप्रकारच्या एक ना अनेक दैवशक्ती तिच्यामध्ये असतात. असं म्हणतात की, देवाला प्रत्येकाच्या घरी जायला शक्य होत नाही म्हणून देवाने आई स्वरुप अदभूत मुर्ती तयार केली. आणि म्हणूनच मी माझ्या आईला माझा देव मानतो अर्थात तुम्हीही माना कारण आईसारखे दैवत सा-या जगता मध्ये नाही. आई ही मुर्ती असते एकच पण तिची किर्ती फार मोठी असते तुम्ही ते मान्यही कराल कारण ती एकाच वेळेला अनेक भुमिका निभावत असते कधी तिला संसारात पतीची साथ निभवावी लागते तर कधी आपल्या मुलांचा हट्ट पुर्ण करावा लागतो ती सर्वांची काळजी अतिशय प्रेमळपणे घेत असते आणि ती ही मनात कुठलाही स्वार्थ न ठेवता. मात्र..! आपण तिची काळजी कधी घेत नाही. मुलं कितीही मोठे झाले तरी त्या मुलांची काळजी आईलाच वाटत असते असे तिचे वेडे मन असते मात्र आपलं दुर्दैव एवढे की आपण तिचे ते प्रेम समजुन घेत नाही.
एक सत्य मला इथे उघड करावसं वाटतं, मला स्वत:ला आलेले अनुभव ते असे की, सद्याच्या कलियुगातील काही भटकलेले दांम्पत्य त्यांनी त्यांचे स्वत:चे एक आगळे वेगळे आयुष्य निर्माण केले आहे त्याबद्दल मी काही बोलत नाही कारण खरं बोलले की बरं वाटत नाही पण एक गोष्ट मात्र त्यातील नक्कीच सांगावीशी वाटते ती अशी, एक गाव होतं तिथे एक गरीब आई व तिचा मुलगा गुण्या गोविंदाने राहत होते, त्या मुलाचे एका मुलीवर प्रेम आहे हे आईला कळाल्यावर आई त्यांच्या लग्नाला इच्छा नसतांनाही सहमती देते. लग्न झाल्यावर थोडे दिवस ते सुखात राहतात काही दिवसानंतर ती मुलगी त्या मुलाला म्हणते की तुझ्या आईला आपल्यापासून वेगळे राहायला सांग त्यांचा त्रास सहन करायला मी रिकामी नाही मला माझ्या संसारामध्ये तिसरी व्यक्ती चालणार नाही तर तोच मुलगा ज्याला आईने जन्म दिला, लहानाचं मोठं केलं आणि त्याने काल-परवा लग्न होऊन आलेल्या त्या मुलीच्या सांगण्यावरुन त्या बिचा-या निष्पाप आईला घराच्या बाहेर काढलं. बिचारी निराधार झाली. सांगायच तात्पर्य एवढेच की, आपल्या आई-वडीलांना कधीही निराधार करु नका कारण आपण कितीही जन्म घेतले तरीही आई-वडीलांचे ऋण नाही फेडू शकत म्हणून मनुष्य प्राण्याला एवढेच सांगु इच्छितो की, मनुष्याला मानव जन्म हा फार हाल-अपेष्ठा सोसल्यानंतर मिळाला आहे म्हणून आपल्या प्रत्येक दिवसाची सुरवात ही आई-वडीलांचे चरण स्पर्श करुनच व्हायला हवी, त्यांना कोणत्या गोष्टीची नेमकी गरज आहे ती त्यांना आणून द्यायला हवी, त्यांना नेहमी सुखी व समाधानी ठेवलं पाहीजे, त्यांना कशाचीही कमी भासू देऊ नका कारण हा जन्म आपल्यांना परत मिळतो की नाही याची शास्वती नाही म्हणून या जगामध्ये ज्या-ज्या बुध्दीजीवी मानव प्राण्यांना जन्म अनमोल भेट स्वरुपात मिळाला आहे त्या प्रत्येक मानव प्राण्याने आपल्या आई-वडीलांची सेवा करणे हे आपले आद्य कर्तव्यच मानायला हवे.
जाता-जाता एकच सांगतो की, ज्या आनंदाने आपले आई-वडील आपल्या पहील्या श्वासाच्या वेळी आपल्या सोबत होते त्याच आनंदाने आपणही आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या आई-वडीलांसोबत असायला हवे.
!! अशा मातेस माझा शतश: प्रणाम !!


लेखन -
रणजीत विक्रम सुर्यवंशी
मु. पो. खरजई ता. चाळीसगाव