स्वप्नांच्या जगात
स्वप्न! माणूस जिथे कोणत्याही बंधनाला न जुमानता इच्छा-आकांशाचे पंख लावून
कल्पनेच्या गगनात उंच भरारी घेत असतो. स्वप्न म्हणजे त्याने स्वत:शीच निर्मिलेलं त्याच्या मनाचं विश्व! या विश्वात तो स्वत: राजा असतो त्याचं स्वत:च्या
स्वप्नविश्वावर अधिराज्य असतं आणि म्हणूनच हे स्वप्नविश्व त्याला हवंहवंस वाटत,
परंतु तो जेव्हा स्वप्नविश्वातून बाहेर पडून कठोर वास्तवाच्या जगात येतो तेव्हा
त्याच्या ओंजळीत सत्य मात्र आसवाचेच दान टाकते. माणूस जेव्हा स्वप्नांची एकेक वीट
रचून स्वप्नांची इमारत बांधतो तेव्हा त्याला वास्तवाचे भान नसते. तो त्या आभासरुपी
वातावरणात इतका रममाण होतो की स्वप्नांची शृंखला तुटल्यावर स्वप्न इमारत कोसळते.
या इमारतीचे अवशेष पाहतांना त्याच्या मनाला अनंत व असह्य यातना होतात. स्वप्न आणि
वास्तव यांच्यात हा असा विरोधाभास आहे. तरीही माणसाला स्वप्न हवंहंवस वाटतं.
स्वप्न हे चंद्राच्या शीतल प्रकाशासारखं असतं ते मनाला सुखावतं, स्वप्नामुळे मानवी
जीवनाला नित्य नुतन पालवी फुटत असते. जीवनात आणखी काहीतरी मिळविण्यासाठी स्वप्नच
माणसाला प्रेरीत करतात. स्वार्थी वृत्तीने स्वप्न पाहीली असता माणूस अधोगतीला
जातो. स्वप्न पुर्ण होण्यासाठी विशिष्ट कालावधी जावा लागतो. स्वप्न पुर्तीसाठी
परीश्रमही करावे लागतात. आजची युवा पिढी मात्र स्वप्नरंजनात गुंतलेली आढळते. शिवाय
त्यंची स्वप्ने एका रात्रीत श्रीमंत व्हावे, अशा स्वरुपाची असतात. यातून हे तरुण
वाममार्गाकडे वळतात. वास्तविक, मोह, माया, सत्ता, पैसा यांसारख्या प्रलोभनांच्या
स्वप्नदुनियेचा त्याग करुन एक नवं विस्तृत असं जग तरुनांनी निर्माण केलं पाहीजे.
फक्त स्वत:च्या सुखाची स्वप्न न पाहता इतरांसाठीही त्याने स्वप्न पाहीली पाहीजेत. स्वप्न
आवश्यक असले तरी त्यामुळे निष्क्रियता येणार नाही, याची काळजी घेतली पाहीजे.
संकलन -
श्री. विनोद विक्रम सुर्यवंशी
मु. पो. खरजई ता. चाळीसगाव